आज 11 जून. पूज्य साने गुरुजी यांचा स्मृतिदिन. कोकणचे भूमिपुत्र, खानदेश चे कर्मयोगी, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील तरुणांचे प्रेरणास्थान, राष्ट्रसेवा दलाचा श्वास, "आंतरभारती" आणि "साधने" चे उगमस्थान, "श्यामची आई" च्या रूपाने संस्कारसुमने महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या ओंजळीने भरभरून टाकणारी महाराष्ट्र माउली, पूज्य साने गुरुजी यांची आज पुण्यतिथी. पूज्य साने गुरूजींना विनम्र अभिवादन. सानेगुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. श्यामची आई मधील श्याम किंवा पंढरी हे पूज्य साने गुरुजीच आहेत. गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात पालगड या गावी झाला. गुरुजींच्या शिक्षणाची तशी खूपच परवड झाली प्राथमिक शिक्षण दापोली तालुक्यातील पालगड या त्यांच्या गावी झाले तर माध्यमिक शिक्षण पुढे दापोली, औंध आणि पुणे येथे झाले. दापोलीचे मिशन हायस्कूल पुढे ते हायस्कूल अल्फ्रेड गॅडनी हायस्कूल आणि शेवटी तीच शाळा दापोली शिक्षण मंडळाचे लोकमान्य विद्यालय म्हणून ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रातील दोन भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे आणि महामहोपाध्याय पां...