आज 11 जून. पूज्य साने गुरुजी यांचा स्मृतिदिन. कोकणचे भूमिपुत्र, खानदेश चे कर्मयोगी, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील तरुणांचे प्रेरणास्थान, राष्ट्रसेवा दलाचा श्वास, "आंतरभारती" आणि "साधने" चे उगमस्थान, "श्यामची आई" च्या रूपाने संस्कारसुमने महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या ओंजळीने भरभरून टाकणारी महाराष्ट्र माउली, पूज्य साने गुरुजी यांची आज पुण्यतिथी. पूज्य साने गुरूजींना विनम्र अभिवादन. सानेगुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. श्यामची आई मधील श्याम किंवा पंढरी हे पूज्य साने गुरुजीच आहेत.
गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात पालगड या गावी झाला. गुरुजींच्या शिक्षणाची तशी खूपच परवड झाली प्राथमिक शिक्षण दापोली तालुक्यातील पालगड या त्यांच्या गावी झाले तर माध्यमिक शिक्षण पुढे दापोली, औंध आणि पुणे येथे झाले. दापोलीचे मिशन हायस्कूल पुढे ते हायस्कूल अल्फ्रेड गॅडनी हायस्कूल आणि शेवटी तीच शाळा दापोली शिक्षण मंडळाचे लोकमान्य विद्यालय म्हणून ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रातील दोन भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे आणि महामहोपाध्याय पां वा काणे त्याच शाळेचे विद्यार्थी म्हणून श्याम अर्थात गुरुजी स्वतःला भाग्यवान मानत असत. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे दापोली हायस्कूल सोडून छोट्या श्याम ला औंधला जावे लागले.
श्याम औंध संस्थांनाबाहेरील असल्याने त्यास बोर्डिंग ची सुविधा मिळाली नाही म्हणून आठ आणे भाड्याने एक खोली घेऊन तेथे राहावे लागले. दुर्दैवाने पुढे औंधमध्ये प्लेगची साथ पसरली आणि श्याम ला तिथून पुण्याला जावे लागले. शिक्षण प्रसारक मंडळ यांचे नूतन मराठी विद्यालय अर्थात नू. म. वि. येथे श्याम ने पुढील माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्याच संस्थेच्या त्यावेळच्या न्यू पुना कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हे महाविद्यालय आता सर परशुरामभाऊ महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. गुरुजींनी पदवी शिक्षण येथे पूर्ण केले. या संपूर्ण विद्यार्थीदशेत गुरुजींना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. पुण्यात शिकताना अनेक घरी वार लावून जेवण करावे लागे. कित्येकदा गुरुजी उपाशीच असत. गुरुजींचे मातृछत्र बालपणीच हरपल्याने त्यांच्या चित्ताची अस्वस्थता व वेदना सहन करण्यापलीकडे होत्या मात्र प्रतिकूल परिस्थितीतही गुरुजींनी ज्ञान साधनेत खंड पडू दिला नाही.
बी ए झाल्यानंतर त्याच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गुरुजींना फेलोशिप मिळाली. याच कालावधीत गुरुजी लेखनाकडे वळले. दरम्यान दैनिक केसरी मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली. अमळनेर मधील तत्त्वज्ञान मंदिरात ते विद्यार्थी म्हणून दाखल झाले. तत्त्वज्ञान मंदिरात जाताना गुरुजींनी जे स्वप्न उराशी बाळगले होते, प्रत्यक्षात तेथे गेल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाला.
एकदा तत्वज्ञान मंदिरातील क्लब'मध्ये जेवणाची पंगत म्हणजे मेजवानी होती. सर्व शिक्षक, फेलो तेथील क्लब सदस्य एकत्र जमले होते. तेथील क्लबमधील हरगडी गणा याचा छोटासा मुलगा रूपल्या अत्यंत लाघवी व प्रामाणिक होता. गुरुजींनी सर्वांबरोबर जेवणासाठी रुपल्याचे ताट वाढले मात्र जमलेल्या सर्वांना हा त्यांचा अपमान वाटला शेवटी गुरुजींनी सर्वांचे जेवण आटोपल्यावर रुपल्या बरोबर जेवण घेतले. गुरुजींना तेथील तथाकथित पोशाखी पंडित, तत्वज्ञानी यांचे काळे अंतरंग समजले होते. तेथील व्यवहारात देखील गैरप्रकार लक्षात आल्याने गुरुजींना तेथे राहणे पापमूलक वाटू लागले हे कटूसत्य हे राजा मंगळवेढेकर यांनी "सानेगुरुजींची जीवनगाथा" या चरित्र ग्रंथात नमूद केले आहे. तत्त्वज्ञान मंदिरात शिकत असताना गुरुजींचे पितृछत्र हरपले, भावंडांची काळजी वाटू लागली, त्यांच्या जीवाची घालमेल आणखीच वाढली. पुढे मुंबईला गेले तेथे एम. ए.ची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. त्यानंतर पुन्हा खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप हायस्कूल मध्ये अमळनेरला गुरुजी शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी विद्यार्थी छात्रालय ची जबाबदारी देखील ते पार पाडत होते. गुरुजींच्या सहवासात विद्यार्थ्यांना अपार आनंद मिळे. पुढे गुरुजींच्या शब्दाखातर त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. गुरुजींच्या खांद्याला खांदा लावून खानदेशात स्वातंत्र्य चळवळीचा प्रचार प्रसार केला. अमळनेरच्या या प्रताप हायस्कुल मध्ये असतांना गुरुजींनी छात्रालय दैनिक सुरु केले होते. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनाची सुयोग्य जडणघडण करण्याचे काम ते करीत होते. 1930 मध्ये गुरुजींनी या शाळेचा निरोप घेतला. तोपर्यंत त्यांनी दैनिक छत्रालय चालविले. पुढे गुरुजींनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. यासंदर्भात गुरुजींनी एके ठिकाणी म्हटले आहे, "1930 ला लाहोर ला स्वातंत्र्याचा ठराव झाला आणि माझ्या हृदयात उजाडले." गुरुजींच्या या नव्या प्रवासाला तेथील मुख्याध्यापक श्री गोखले यांनी यश चिंतिले ते "शुभास्ते पंथान सन्तु।" असे संबोधून. गुरुजी सूत कातायला शिकले. त्यांच्याच एकेकाळच्या छात्रालयातील नामदेव उत्तम या विद्यार्थ्यांनी त्यांना हे काम शिकविले. हे दोघे पूर्णवेळ स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत होते. मग काय दोन शिष्यांसह गुरुजींना खादीचा प्रचार प्रसाराच्या कार्याला बळ मिळाले. त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. पायाला भिंगरी लावून त्यांनी संपूर्ण खान्देश पालथा घातला. सभा मिरवणुका खादी प्रदर्शने आयोजित करून लोक जागृती घडवून आणली. निधी मिळविला. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी लोक मंत्रमुग्ध होऊन जात असत.गुरुजींनी गावोगाव फिरून स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठा निधी मिळविला. ग्रामस्वच्छतेचे धडे दिले. शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. राजकीय गुलामगिरीची जाणीव निर्माण करून दिली. सामाजिक ऐक्याचे आणि अस्पृश्यता निवारणाचे आवाहन केले. गुरुजींचे हृदय अतिसंवेदनशील होते. सभोवतालच्या घटना त्यांच्या नजरेतून सुटत नसत. वेळ मिळेल तसे ते लिहीत होते. त्यांच्या लेखणीत मातृत्वाचा ओलावा असे. संस्काराची शिदोरी विचारधनातून वाचकांच्या पुढे जाते असे. त्यांचे प्रत्येक पुस्तक लोकप्रियतेच्या शिखरावर होते मात्र दैवदुर्विलास म्हणजे त्या वेळी कोणत्याही मराठी साहित्य संमेलनात गुरुजींना आमंत्रण नसे आणि तथाकथित संयोजकांना गुरुजींच्या साहित्याची दखल घ्यावीशी वाटत नसे.
एकदा आचार्य विनोबाजी गुरुजींना म्हणाले होते, "गुरुजी तुम्ही साहित्य संमेलनाच्या मंचावरून तुमचे विचार मांडले पाहिजेत तुम्ही तेथे गेले पाहिजे." गुरुजींनी विनोबाजींना उत्तर देणे टाळले कारण त्या वेळचे तथाकथित साहित्यिक गुरुजींना साहित्यिक मानायला तयार नव्हते. बहुजन समाजाचे दुःखाचे प्रतिबिंब त्यावेळच्या साहित्यात दिसत नव्हते. साहित्य संमेलनातून ते व्यक्त होत नव्हते त्यामुळे अशा ठिकाणी जाणे गुरुजींना अप्रशस्त वाटत असावे.
गुरूजींची सचोटी , अस्मिता प्रखर होती. एकदा वर्ध्याला विनोबाजींना भेटून ते माघारी परतले तेव्हा उद्योगपती जमनालाल बजाज गुरुजींना म्हणाले, "कामासाठी काही पैसे देऊ का?" गुरुजींनी नम्रपणे नकार देत, खानदेशातील मित्र मदत करीत असतात असे सांगितले. गुरुजींनी चाळीसगाव तालुक्यात वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग घेतला होता तेथे त्यांना अटक झाली होती. तेथील हवालदार अमळनेरच्या प्रताप हायस्कूलच्या माजी विद्यार्थी होता. रात्री उशिरा राजकीय कैदी पकडून आणल्याची वर्दी मिळाली. हवालदार उद्वेगाने म्हणाले, "हे लोक जेवण करू देत नाहीत. बंद करून टाका त्याला कोठडीत." जेवण आटोपल्यावर हवालदार कोठडीकडे गेले. हातातील दिव्याच्या उजेडात त्यांना गुरुजी दिसले आणि त्यांच्या डोळ्याना धारा लागल्या. पश्चात्तापदग्ध होऊन त्यांनी गुरुजींच्या पायावर डोके ठेवले. दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेट समोर हजर करताना गुरुजींच्या हाताला बेडी घातली नाही किंवा दंडाला दोरी बांधली नाही. यावर मॅजिस्ट्रेट ने विचारणा केली असता ते म्हणाले, "कैदी पळून जाऊ नये ही माझी जबाबदारी बाकी आपले काम आपण करा."
राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 मध्ये जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे होणार होते. देशभरातून मान्यवर नेते, कार्यकर्ते येणार असल्याने प्रचंड तयारी करावी लागणार होती. गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांसह, कार्यकर्त्यांसह अहोरात्र झटत होते. निधी गोळा करणे, मंडप उभारणे, खादी प्रदर्शन आयोजित करणे, तात्पुरते निवारागृह उभारणे, शौचालये उभारणे अनेक जबाबदाऱ्या गुरुजींनी स्वतःवर ओढवून घेतल्या आणि त्या दिवस-रात्र खपून यशस्वीरीत्या पूर्ण देखील केल्या.
खानदेशात अतिवृष्टीने पिके बुडाली तेव्हा सारामाफीसाठी गुरुजींनी सत्याग्रह केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. किसान मोर्चा साठी त्यांनी स्फूर्तीदायी गीत लिहिले -
आता उठवू सारे रान
आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी
लावू पणाला प्राण ।। धृ ।।
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात गुरुजींना अनेकदा कारावास झाला. धुळे, नाशिक आणि त्रिची (त्रिचनापल्ली) येथील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते. राजकीय कैदी म्हणून कारागृहात गुरुजींनी एखाद्या साधका प्रमाणे आपले कार्य सुरूच ठेवले. त्यात खंड पडू दिला नाही. श्यामची आई हा अति सुंदर अविष्कार नाशिकच्या कारागृहात घडून आला. धुळे येथील कारागृहात देखील गुरुजींनी लेखन सुरूच ठेवले होते. त्रिचनापल्लीच्या कारागृहात आंतरभारतीच्या स्वप्नास निश्चित दिशा मिळाली. त्यासाठी तेथील बंदीजनांकडून त्यांनी तेलुगु व तमिळ भाषा शिकून घेतल्या. गुरुजी कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय सभेच्या त्रिपुरी व हरिपुरा येथील अधिवेशनास उपस्थित होते. या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी गुरुजींचा परिचय झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या कार्यात देखील सारेच अलबेल नव्हते. विघ्न आणणारी मंडळी सर्वकाळ, सर्वत्र असतात. तशी ती तेथेही होती. गुरुजी उद्विग्न झाले. खानदेशात काम करताना काँग्रेस श्रेष्ठींकडून जी वागणूक गुरुजींना दिली जात होती, अडवणूक केली जात होती, तशीच अवस्था सुभाषबाबूंची झाली हे गुरुजींच्या लक्षात आले.
एकदा नागपूर दौरा आटोपून नेताजी सुभाषचंद्र बोस रेल्वेने मुंबईला जात होते. गुरुजींना ही वार्ता समजली. गुरुजी रेल्वे स्टेशनला पोहोचले. प्लॅटफॉर्मवर गुरुजींनी भक्तिभावाने नेताजींना वाकून चरणस्पर्श केला, तेव्हा नेताजींनी देखील गुरुजींना वाकून चरणस्पर्श केला. मात्र काँग्रेस वाल्यांचा जळफळाट होत होता.
सुभाषबाबूंवरील अन्यायावर गुरुजींनी "काँग्रेस" या पत्रातून टीका केली. त्यामुळे अधिक नाराजी वाढली. नाशिकच्या कारागृहात गुरुजींनी राष्ट्र सेवा दलाची गरज समजावून सांगण्यासाठी "श्यामची पत्रे" हे पुस्तक लिहून पूर्ण केले. चांदवडच्या युवक परिषदेच्या वेळी गुरुजींना धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय विचारांचा संस्कार करण्याची गरज भासली.
नंदुरबारला शिरीषकुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांना
9 सप्टेंबर 1942 रोजी ब्रिटिशांनी गोळ्या घालून अमानुषपणे ठार केले. तेव्हापासून ब्रिटिश सरकारची वक्रदृष्टी गुरुजींवर होती. भूमिगत राहून गुरुजींनी आपले कार्य सुरू ठेवले होते. आपल्या लेखणीतून ते तरुणांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देत होते. एकेठिकाणी आचार्य अत्रे गुरुजीं बद्दल लिहितात, "मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी - साने गुरुजी." गुरुजींच्या लेखनाचा आवाका स्तिमित करणारा होता. एकदा गुरुजींनी 24 तास स्वतःला कोंडून घेऊन "क्रांतीच्या मार्गावर" हे 100 पानी पुस्तक एकटाकी लिहून पूर्ण केले.
नोव्हेंबर 1946 मध्ये गुरुजींनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजन बांधवांना दर्शनासाठी खुले व्हावे म्हणून प्राणांतिक उपोषणाचा संकल्प केला. 1947 चाली राष्ट्र सेवा दल काँग्रेसपासून वेगळे व मुक्त झाले. गुरुजींना मोकळा श्वास घेता आला, मात्र आव्हाने कमी नव्हती. गुरुजी एका पत्रात लिहितात, "यापुढे राष्ट्रसेवा दलाला चौफेर अडचणी आहेत. काँग्रेसच्या शिव्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाप, सरकारचा त्रास अशा कसोटीतून आपले कार्य प्रामाणिकपणे पुढे न्यावे लागेल."
यातून गुरुजींची तळमळ स्पष्ट होते. 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधीजींच्या हत्येने गुरुजी अधिकच उद्विग्न झाले. 14 मे 1949 रोजी पुण्यातील मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदाच गुरुजी हजर राहिले आणि आंतरभारती चा ठराव मांडला. त्यांच्या भाषणाने सर्व साहित्यिक प्रभावित झाले. पुढे गुरुजींना साधना मासिकासाठी ची आर्थिक चिंता अधिक सतावू लागली. अत्यंत प्रतिकूल स्थितीत गुरुजींनी "साधना" प्रवास सुरू ठेवला होता. 30 जानेवारी 1950 रोजी गुरुजी साबरमती आश्रमात गेले होते. याच वर्षीच्या मे महिन्यात सांगलीत राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात गुरुजींनी कला पथकाची कल्पना मांडली होती. तेथून ते कर्नाटक मध्ये गेले होते आणि दोन जून 1950 ला कर्नाटक दौरा आटोपून माघारी परतले आणि 11 जून 1950 रोजी गुरुजींनी आत्मक्लेश मार्गाने जगाचा निरोप घेतला. गुरुजींचे मानवतावादी विचार अजरामर आहेत.
तीच आपली कार्य प्रेरणा आहे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
साने गुरुजींवर अत्यंत सुंदर लेख. आणि अभ्यासपूर्ण देखील.
ReplyDeleteसर खूप खूप धन्यवाद
DeleteReally very much informative article on resp.Mauli Sane Guruji.The article recalled my memories of our visit at Amalner .I appreciate your honest efforts Sir.
ReplyDeleteThank You sir.
Deleteचतुरस्त्र लेखणीतून उमटलेला
ReplyDeleteएक हृदयस्पर्शी लेख
।।
।।
खूपच सुंदर
Very beautiful article sir..
ReplyDeleteमूर्तिमंत साने गुरुजींचे हृदयस्पर्शी दर्शन लेखातून झाले.परिश्रमपूर्वूक साकारलेला सुंदर आविष्कार!
ReplyDeleteसर ही तुम्ही दिलेली शिदोरी आहे.
ReplyDelete🙏🌹