आंबे-दिंडोरी एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कुल, आंबे दिंडोरी येथील गणित अध्यापक श्री घायतड सर दिनांक 30 नोव्हेंबर, 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांच्या सेवाकाळात त्यांच्या कार्याने अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळाली.
त्यांचा सेवा काळ हा शिक्षणक्षेत्रातील कर्मयोग मानला जाईल यात शंका नाही.
सरांचे प्राथमिक शिक्षण येवला तालुक्यातील नागडे या गावी झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण स्वामी मुक्तानंद विद्यालय, येवला; तर उच्च माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय येवला येथून पूर्ण केले. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील विज्ञान महाविद्यालय येथून त्यांनी बी एस्सी (गणित) ही पदवी पूर्ण केली.
पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले.
गणित अध्यापक म्हणून त्यांनी शांतारामबापू वावरे यांच्या संस्थेत लाखलगाव येथे (अप्रशिक्षित अध्यापक)
सेवा सुरू केली.
त्यानंतर हिरे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मालेगाव येथून शिक्षणशास्त्र पदवी (बी एड) पूर्ण केले आणि 26 नोव्हेंबर 1990 पासून न्यू इंग्लिश स्कुल, आंबे-दिंडोरी येथे समर्पित वृत्तीने सेवा बजावली.
ग्रामिण भागात शैक्षणिक सुविधांची वाणवा असताना, कल्पकतेने आणि परिश्रमपूर्वक गणित आणि भूमिती विषयाची अल्प खर्चाने बहुउद्देशीय साहित्यनिर्मिती केली. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण प्रतिकृतींच्या (मॉडेल्स) सहाय्याने शिकविण्यात सरांची हातोटी वाखाणण्यासारखी आहे.
व्यवसायनिष्ठा, कर्तव्यपरायणता, सचोटी, सर्जनशीलता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची तळमळ आणि प्रयोगशील वृत्ती या सद्गुणांचा समुच्चय म्हणजे श्री घायतड सर.
सरांचे माजी विद्यार्थी, प्रगतीशील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि आंबे-दिंडोरी एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री सुभाष वाघ म्हणतात,"श्री घायतड सर प्रयत्न आणि पराकाष्ठेत कुठेच कमी पडले नाहीत. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त, दिड ते दोन तास विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पायंडा त्यांनी संपूर्ण सेवा काळात जपला.
गणिताचे प्रत्येक उदाहरण सोडविल्याशिवाय त्यांचा अभ्यासक्रम पुढे सरकत नसे. प्रत्येक बॅच ला ते स्वतः चे उदाहरण देऊन प्रेरित करीत असत. दहावी सहामाहीत अनुत्तीर्ण झाल्यावर चिकाटीने अभ्यास करून ते दहावीला शाळेत गणित विषयात 87 गुण मिळवून पहिले आले होते. आमच्या ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळे. श्री घायतड सर हे जमिनीवर राहून काम करणारे ऋषितुल्य शिक्षक आहेत."
अर्चना टोंगारे ही माजी विद्यार्थिनी लिहिते, " श्री घायतड सर गणित भूमितीच्या साहित्याद्वारे आम्हाला सोप्या पद्धतीने शिकवीत असत.
8 वीत NMMS च्या परीक्षेची अतिरिक्त तयारी ते करवून घेत असत. त्यांच्या अध्यपनामुळे आम्हा विदयार्थ्यांचा गणित विषयातील आत्मविश्वास खूप वाढला."
SCERT च्या जीवन शिक्षण मासिकातील 1998 च्या सुवर्ण महोत्सवी विशेषांकात 'बहुउद्देशीय षटकोन' हा भूमितीविषयक लेख, तसेच जानेवारी 2001 च्या जीवन शिक्षण मासिकात 'गणिताची छोटी प्रयोगशाळा - कृती संशोधन' हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता.
मी एके रविवारी माझ्या मुलीच्या गणितातील अडचणी सोडविण्यासाठी आंबे दिंडोरी येथे सरांकडे गेलो होतो.
तब्बल अडीच तास त्यांनी आम्हाला त्यांच्या अभिनव अशा गणित प्रयोगशाळेत खिळवून ठेवले होते.
नाशिक शहरातील अनेक शाळांमधील शिक्षक कुतूहलाने त्यांच्या गणित प्रयोगशाळेला भेट देतात.
अनेकांना त्यातून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले आहे.
सरांनी शासनाच्या ALP (Accelerated Learning Programme) उपक्रमात राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक, गणित आशय समृद्धी उपक्रमात जिल्हा तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.
त्यांनी काही काळ दिंडोरी गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
शाळेच्या वेळेव्यतिरिक्त, त्यांनी आंबे-दिंडोरीच्या पंचक्रोशीत ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकशिक्षणाद्वारे एड्स जनजागृती मोठ्या प्रमाणावर घडवून आणली.
शाळेत गरीब विद्यार्थी सहायता उपक्रम अखंडपणे राबविला. संस्थेच्या शैक्षणिक विकासार्थ निधी उभारणीत देखील मोठी मदत केली.
माजी शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे, तत्कालीन सचिव श्री नंदकुमार यांनी नाशिक येथील शिक्षण वारीत प्रमाणपत्र देऊन सरांचा सत्कार केला होता.
माननीय आमदार सुधीर तांबे यांनी शुभेच्छा पत्र लिहून सरांच्या या कार्याचे कौतुक केले होते.
माजी विद्यार्थी सेवापूर्ती निमित्त शिक्षकाचे होर्डिंग्ज लावतात असा प्रसंग पहिल्यांदा घडतो आहे. यातच सरांच्या कार्याची पावती मिळते.
यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना होत राहील अशी अपेक्षा.
त्यांना, सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा.
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभकामना.
संराना खुप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस शुभेच्छा
ReplyDeleteसंराचा फोन नंबर टाका
ReplyDelete